वाचक लिहितात   

सरकारचे हे अपयशच!
 
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना नक्कीच न्याय मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी ’मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना दिले आहे. मोदी आता नेहमीच्या तंत्राने लष्कराला पणाला (लष्कराला दाढेला देऊन!) लावून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करतीलही, परंतु पीडितांच्या प्रियजनांचे प्राण परत मिळणार नाहीत. भारत-पाकिस्तान सीमेपासून तब्बल २०० किलोमीटर आत दहशतवादी येतात काय आणि भयंकर नरसंहार करून जातात काय, हे अनाकलनीयच! सरकारचा सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणाच या निमित्ताने समोर आला आहे. मोदी सरकारचे हे अपयशच होय!
 
श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा)
 
बेपत्ता ज्येष्ठ नागरिक
 
राज्यात वर्षभरात सुमारे ४४२७ ज्येष्ठ नागरिक हरवले, स्मृतिभ्रंषामुळे बहुतांशी ज्येष्ठ नागरिक विसरतात परतीची वाट हे वृत्त वाचनात आले. या गंभीर प्रसंगास त्यांच्या कुटुंबियांना सामोरे जावे लागत आहे. घरातून बाहेर पडताना बरोबर आपले ओळखपत्र, भ्रमणभाष विस्मृतीमुळे घेतले जात नाही. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अशा बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे शक्य आहे. त्यासाठी त्यांच्या दंडात आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) टॅग किंवा बारकोड टॅग बसवणे, यावर त्यांचे संपूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, संपर्क व्यक्तीचे नाव, त्यांचा भ्रमणभाष ही माहिती असेल. त्यामुळे ते कोण आहेत त्याची माहिती मिळेल, तसेच ते नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत हे पण समजेल. या खेत्राटीक जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
 
विजय देवधर, पुणे
 
शिवशाही बसबद्दल नाराजी
 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी गेल्या ७७ वर्षांच्या कारकिर्दीत वातानुकूलित, विना वातानुकूलित, आराम, नीम आराम, हिरकणी, शिवाई, शिवशाही अशा प्रकारच्या बससेवा सुरू केल्या. त्यातील शिवनेरी हा प्रकार प्रवाशांच्या पसंतीस उतरला; परंतु त्यानंतर आणलेल्या शिवशाही बस सेवा सुविधेवर प्रवासी मोठ्या संख्येने नाराजी व्यक्त करत आहेत. एसटी महामंडळाने त्या बस सेवेच्या सोयींमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे वाटते. कारण प्रवाशांच्या तक्रारीनुसार बंद पडणारी वातानुकूलित यंत्रणा, फाटक्या बस सीट्स, त्यांचे कव्हर, मार्गांत अचानक बंद पडणार्‍या बसेस यामुळे प्रवाशांच्या अडचणी व गैरसोयीत वाढ होत आहे. जादा प्रवासी भाडे देऊन बर्‍याच प्रकारच्या गैरसोयी प्रवाशांनी आणखी किती काळ सहन कराव्यात हे त्यांचे मुख्य प्रश्न आहेत. एसटी महामंडळ प्रवाशांच्या गैरसोयींकडे तातडीने लक्ष देईल या अपेक्षा आहेत.
 
राजन पांजरी, जोगेश्वरी.
 
बसमध्ये मद्यपींना प्रवेश नको
 
लाखो प्रवासी दररोज, शिक्षण, नोकरी वा वैयक्तिक कामासाठी पीएमपीएमएलने प्रवास करतात. बर्‍याचदा काही प्रवासी मद्य प्राशन करून प्रवास करताना आढळून येतात. अशा मद्यधुंद प्रवाशांचा लहान मुले, स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती यांना त्रास होतो. अश्लिल हावभाव करणे, जागेवरुन भांडण करणे, मोठमोठ्याने गाणी म्हणणे असे प्रकार होताना दिसतात. तरी पीएमपीएमएल प्रशासनाने असे मद्यधुंद प्रवासी आढळून आल्यास त्यांना प्रवेश नाकारावा. अगोदरच बसमधून प्रवास करत असतील व त्याचा इतरांना त्रास होत असेल, तर वाहकाकरवी त्यांना पुढील थांब्यावर उतरवून द्यावे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.
 
सुरेश जवरगी, पुणे
 
महिला आमदारांची संख्या नगण्य
 
नुकत्याच झालेल्या विधानसभा  निवडणुकीत जिंकून आलेल्या महिला आमदारांची  संख्या अतिशय नगण्य आहे. २८८  जागांसाठी एकूण २५० महिलांनी निवडणूक लढवली पण निवडून आल्या  फक्त २१ महिला. याचाच अर्थ एकूण आमदारांपैकी महिला आमदारांची संख्या फक्त ७.२९ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभेत निवडून आलेल्या महिला आमदारांची संख्या यापेक्षा अधिक होती. महिलांना जर राजकारणात  पुरेसे प्रतिनिधित्व दिले तर महिला त्यांना दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.  दुर्दैवाने महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही महिला आमदारांची संख्या अतिशय नगण्य आहे. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
ईडी कार्यालयातील आगीमागे संशयाचा धूर?
 
फोर्टमधील ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे जळून खाक झाल्याची बातमी वाचनात आली. यामुळे काही प्रकरणाच्या तपासावर परिणाम होणार असल्याचे कळते. अशाच प्रकारची आग काही वर्षांपूर्वी मंत्रालयातही लागली होती. तेव्हाही महत्वाचे कागदपत्र जळाले होते, तर प्रादेशिक परिवहन विभागाच्या पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई (ताडदेव) येथील कार्यालयांनी सात-आठ वर्षापूर्वी ठराविक अंतराने लागलेल्या आगीत वित्तहानी व महत्त्वाची कागदपत्रे जळणे हे सामायिक घटक होते आणि त्यामुळे त्या आगींमागे संशयाचा धूर जाणवला होता, तसेच काहीसे संशयाचे वातावरण ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे तयार झाले आहे. अशा प्रकरणांची सखोल चौकशी होणे आवश्यक ठरते.
 
दीपक गुंडये, वरळी.

Related Articles